पुणे (प्रतिनिधी) : राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत डिजिटल प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे खेळाडूंना आता घरबसल्या क्रीडा प्रमाणपत्राची डिजिटल पडताळणी करून ई-प्रमाणपत्र मिळणार आहे.
या नव्या प्रणालीअंतर्गत शासकीय पदभरतीसाठी, विशेषतः Maharashtra Public Service Commission तसेच इतर शासकीय भरती प्रक्रियेत अर्ज करताना खेळाडूंना ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास खेळाडू संवर्गातील अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ज्या खेळांचे अभिलेख या डिजिटल प्रणालीवर उपलब्ध आहेत, त्या खेळाडूंनी तात्काळ प्रणालीचा लाभ घेऊन आपले डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बोगस प्रमाणपत्रांना आळा
यासंदर्भात माहिती देताना शीतल तेली-उगले, आयुक्त क्रीडा व युवा सेवा यांनी सांगितले की, ही प्रणाली ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार होऊ शकत नाही. त्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा बसणार आहे.
खेळाडूंनी आवश्यक माहिती भरल्यानंतर ती मूळ अभिलेखांशी जुळल्यास अवघ्या २४ तासांत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होणार आहे. तसेच प्रत्येक प्रमाणपत्रावर अद्वितीय क्यूआर कोड देण्यात येणार असून, त्याद्वारे नियुक्ती प्राधिकाऱ्यांना प्रमाणपत्राची सत्यता त्वरित तपासता येणार आहे.
संकेतस्थळावरून माहिती
यापूर्वी विभागीय उपसंचालकांकडून प्रमाणपत्र पडताळणी केलेल्या खेळाडूंनी देखील पुढील शासकीय किंवा निमशासकीय भरतीसाठी अर्ज करताना या प्रणालीद्वारे ई-प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शक सूचनांसाठी खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहल क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी केले आहे.





