नाशिक | प्रतिनिधी
ऑलिंपिक सप्ताहानिमित्त कालिका देवी मंदिर संस्थान, यशवंत व्यायाम शाळा, क्रीडा संस्कृती फाउंडेशन आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेला रविवारी (२८ जून) उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागांतील युवा तलवारबाजांनी सहभाग नोंदवत आपली कौशल्ये सादर केली.
स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शरयू पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र थ्रोबॉल संघटनेचे सरचिटणीस राहुल वाघमारे होते.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, तलवारबाजी राज्य संघटनेचे सहसचिव अविनाश दुधाणे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजू शिंदे तसेच स्पर्धा समन्वयक अविनाश ढोली यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना शरयू पाटील म्हणाल्या, “अशा प्रकारच्या स्पर्धांमधूनच खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी भक्कम तयारी करण्याची संधी मिळते. प्रत्येक खेळाडूने या संधीचे सोने करत सातत्याने मेहनत घेतली पाहिजे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन राहुल पडवळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रसाद परदेशी यांनी केले.
स्पर्धेचे निकाल
ईपी (मुले)
- प्रथम : विराल मस्के
- द्वितीय : आदित्य बनगर
- तृतीय : अर्णव बनगर, विराज गोसावी
फॉइल (मुले)
- प्रथम : प्रणव डेरले
- द्वितीय : चिरायू पाटील
- तृतीय : रियांश कराड, साहिल कांदळकर
सॅबर (मुले)
- प्रथम : परदेशी
- द्वितीय : आदित्य पाटील
- तृतीय : संकेत पाटील, कार्तिक वराडे
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी युवा तलवारबाजांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली. आगामी फेऱ्यांमध्ये अधिक चुरशीच्या लढती पाहायला मिळणार असल्याने स्पर्धेबाबत खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली.





