मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील क्रीडा आणि युवा विकासाला नवी दिशा देण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था उभारणे, खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य क्रीडा राज्य बनविण्यासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजनांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेला आणि ‘खेलो भारत’ उपक्रमाच्या उद्दिष्टांना गती देण्याबरोबरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्राला देशातील सर्वोत्तम क्रीडा राज्य बनविण्याच्या दृष्टिकोनाला प्रत्यक्ष अंमलबजावणीची जोड देण्यावर भर देण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीला MITRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, भारत सरकारचे क्रीडा सचिव व भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (SAI) महासंचालक हरि रंजन राव, महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव (क्रीडा) रणजीत सिंह देओल, भारत सरकारच्या क्रीडा विभागाचे संयुक्त सचिव आर. विनील कृष्ण यांच्यासह केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
क्रीडा विकासावर सखोल विचारमंथन
बैठकीत महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्र अधिक सक्षम, आधुनिक आणि परिणामकारक करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा झाली. क्रीडा प्रशासनात आवश्यक संस्थात्मक सुधारणा करून निर्णय प्रक्रिया अधिक पारदर्शक, गतिमान आणि परिणामकारक करण्यावर भर देण्यात आला.
राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक यश मिळावे यासाठी हाय परफॉर्मन्स (High Performance) प्रणाली विकसित करणे, आधुनिक प्रशिक्षण पद्धतींचा अवलंब करणे आणि प्रशिक्षकांच्या क्षमता विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
तसेच क्रीडा विज्ञान (Sports Science), क्रीडा वैद्यक, पोषण, मानसिक तयारी, फिटनेस आणि डेटा विश्लेषणाचा प्रभावी वापर करून खेळाडूंची कामगिरी उंचावण्यावरही चर्चा झाली.
खेळाडू विकासाची साखळी मजबूत करण्यावर भर
राज्यातील ग्रामीण भागापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू घडविण्यासाठी खेळाडू विकास मार्ग अधिक सक्षम करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रतिभावान खेळाडूंचा शोध, त्यांचे दीर्घकालीन प्रशिक्षण, स्पर्धात्मक संधी आणि आर्थिक सहाय्य यांची प्रभावी साखळी निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
याशिवाय राज्य शासनाच्या ‘मिशन लक्ष्यवेध’ उपक्रमाला अधिक बळकटी देणे, खेलो इंडिया केंद्रांचे जाळे मजबूत करणे आणि तळागाळातील गुणवंत खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.
आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांवर भर
महाराष्ट्रातील क्रीडा संकुले आणि प्रशिक्षण केंद्रे जागतिक दर्जाची करण्यासाठी शाश्वत क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच क्रीडा संकुलांचे व्यावसायिक व्यवस्थापन (Professional Sports Facility Management) विकसित करून त्यांचा अधिक प्रभावी वापर करण्याबाबतही चर्चा झाली.
डिजिटल प्रणाली आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य
खेळाडूंच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल खेळाडू डेटाबेस तयार करण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. यामुळे खेळाडूंची कामगिरी, प्रशिक्षण, आरोग्य आणि स्पर्धात्मक प्रगती यांचे वैज्ञानिक पद्धतीने मूल्यांकन करता येणार आहे.
याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्थांशी सहकार्य वाढविणे, खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविणे, राज्यातील स्पर्धा संरचनेचे पुनरावलोकन करणे आणि ‘प्रोजेक्ट महादेवा’ च्या प्रभावी अंमलबजावणीबाबतही सखोल विचारविनिमय करण्यात आला.
युवा विकासालाही प्राधान्य
बैठकीत केवळ क्रीडा क्षेत्रापुरतेच मर्यादित न राहता युवा व्यवहार अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक संस्थात्मक सुधारणा, युवकांसाठी नवीन संधी आणि कौशल्य विकासाच्या उपक्रमांवरही चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्रात नवे नेतृत्व देण्याचा निर्धार
बैठकीच्या शेवटी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील प्रभावी समन्वय, स्पष्ट धोरण, दूरदृष्टी आणि परिणामकारक अंमलबजावणीच्या माध्यमातून महाराष्ट्राला देशातील सर्वोत्तम क्रीडा राज्य बनविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ही बैठक राज्यातील क्रीडा धोरण, खेळाडू विकास, पायाभूत सुविधा आणि युवा सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, भविष्यात महाराष्ट्राच्या क्रीडा प्रगतीला नवी गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



