छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, विभागीय क्रीडा संकुल समिती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच विविध जिल्हा क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
ऑलिम्पिक चळवळीचा प्रसार, युवकांमध्ये क्रीडाप्रेम निर्माण करणे आणि उत्कृष्टता, मैत्री व आदर या ऑलिम्पिक मूल्यांचा प्रचार करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सूतगिरणी चौक येथून ऑलिम्पिक ज्योत रॅलीने झाली. ही रॅली विभागीय क्रीडा संकुलापर्यंत काढण्यात आली. रॅलीमध्ये विविध क्रीडा संघटनांचे खेळाडू, प्रशिक्षक, पालक तसेच गीता विद्यालय व जय भवानी विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ऑलिम्पिक जोत हातात घेऊन खेळाडूंनी क्रीडा संस्कृतीचा संदेश देत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
यानंतर झालेल्या मुख्य कार्यक्रमात डॉ. प्रविण वक्ते(प्र-कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, सतीश इंगळे (कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन), डॉ. मकरंद जोशी (सचिव, राज्य जिम्नॅस्टिक असोसिएशन), पंकज भारसाखळे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन) तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. दिनेश वंजारे, प्रा. गोविंद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांनी ऑलिम्पिक चळवळीचे महत्त्व, क्रीडा संस्कृती आणि निरोगी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थितांनी यंदाच्या ऑलिम्पिक दिनाच्या “Move, Learn and Discover” या घोषवाक्याला प्रतिसाद देत नियमित व्यायाम, खेळ आणि निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.
कार्यक्रमात योग, तायक्वांदो आणि मल्लखांब या खेळांची आकर्षक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणांमधून शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संतुलन आणि आत्मविश्वासाचा संदेश देण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या १० वी कोरिया ओपन एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धा २०२५ मध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.
ग्रुप इव्हेंट (कांस्यपदक विजेते): आर्य शहा, स्मित शहा, रामदेव बिराजदार, अद्वैत वझे आणि उदय माधेकर.
एरो स्टेप स्पर्धा (कांस्यपदक विजेते): रोहन पागरे, अभय उन्तवाल, संकेत चिंतलवाड, तनिष्क राजगावंकर, प्रेम बांकर, श्रीपाद हराळ, दीपक अर्जुन आणि संदेश चिंतलवाड.
तसेच आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरणपटू रितेश केरे, आट्यापाट्या खेळातील रोहन काळे, सागर सोनवणे व वंशिना कांबळे, तलवारबाजी खेळातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते सागर मगरे तसेच आरुष जमधाडे, समर्थ पठाडे व वैदेही लोहिया आणि कबड्डीपटू अल्केश चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप जगताप यांनी केले. कार्यक्रमास विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये गोकुळ तांदळे, सतीश पाठक, पंढरीनाथ रोकडे, सुरेश मिरकर, प्रा. डॉ. माणिक राठोड, भिकन आंबे, रफिक जमादार, श्याम अंभोरे, लता कलवार, प्रविण वाघ, गणपत पवार, क्रीडा अधिकारी रेखा परदेशी, मुकुंद वाडकर, खंडूराव, राम मायंदे, पूनम नवघिरे आणि सचिन बोर्डे यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी खेळ हा केवळ स्पर्धेचा विषय नसून व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, संघभावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून “खेळातून मैत्री, खेळातून शांतता आणि खेळातून मानवतेची एकता” हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.




