स्पोर्ट्स पॅनोरमा |
सप्टेंबरमध्ये जपानमधील ऐची-नागोया येथे होणाऱ्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (Asian Games 2026) भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा आज (30 जून) करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) महिला निवड समितीने अनुभवी हरमनप्रीत कौर हिच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत तिलाच संघाचे नेतृत्व सोपवले आहे. त्यामुळे तिच्या कर्णधारपदाबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
भारताला आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आल्यामुळे हरमनप्रीतच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी तिचीच कर्णधार म्हणून निवड करण्यात आल्याने निवड समितीने तिच्या अनुभवावर आणि नेतृत्वक्षमतेवर विश्वास कायम ठेवला आहे.
स्मृती मानधना हिची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. अष्टपैलू श्रेयांका पाटील हिलाही संघात स्थान मिळाले असून तिचा अंतिम सहभाग फिटनेस चाचणीतील मंजुरीवर अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, टी-20 विश्वचषक संघातील विकेटकीपर-फलंदाज यास्तिका भाटिया आणि प्रेमा रावत यांना यावेळी संघातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी जी कमलिनी हिला संधी देण्यात आली आहे.
भारताचा महिला संघ हा गतविजेता म्हणून या स्पर्धेत उतरणार आहे. चीनमधील हांगझू येथे झालेल्या 2023 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांनी क्रिकेटमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता. त्यामुळे यंदाही सुवर्णपदक कायम राखण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.
2026 आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), भारती फुलमाली, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकुर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील* (फिटनेसच्या अधीन), राधा यादव आणि नंदनी शर्मा.
भारतीय महिला संघाला गतविजेतेपदाचा मान राखण्याची संधी असून, अनुभवी आणि युवा खेळाडूंच्या संतुलित संघासह भारत पुन्हा एकदा सुवर्णपदकाच्या दावेदारांमध्ये अग्रस्थानी मानला जात आहे.





