छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा २०२६-२७ (१५ वर्षांखालील मुले) स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यानंतर अल इरफान हायस्कूल, खुलताबाद संघाने विजेतेपद पटकावले. गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूल संघाने उपविजेतेपद मिळवले, तर स्टर्लिंग स्टोन हायस्कूल, सावंगी संघाने तृतीय क्रमांकावर समाधान मानले.
या स्पर्धेतील विजेता संघ महाराष्ट्र राज्यस्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरण करण्यात आले.
जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर यांनी सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पंच, प्रशिक्षक, स्पर्धा प्रमुख क्रीडा अधिकारी रेखा परदेशी तसेच सहभागी शाळांचेही त्यांनी कौतुक केले.




