छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
जिल्ह्यातील युवक-युवती आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार 2025-26 साठी पुन्हा एकदा अर्ज मागविण्यात आले आहेत. शासन निर्णय दि. 12 नोव्हेंबर 2013 नुसार हा पुरस्कार जिल्हास्तरावर प्रदान करण्यात येतो.
जिल्ह्यातील युवकांनी समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याला प्रोत्साहन मिळावे आणि युवा विकासाच्या चळवळीला बळ मिळावे, या उद्देशाने शासनामार्फत दरवर्षी जिल्हा युवा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांत एक युवक, एक युवती आणि एक नोंदणीकृत संस्था यांची निवड केली जाते.
पुरस्काराचे स्वरूप
निवड झालेल्या युवक व युवतीला गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी 10 हजार रुपये रोख पुरस्कार, तर निवड झालेल्या नोंदणीकृत संस्थेला गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि 50 हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अर्जांची संख्या कमी; पुन्हा प्रस्ताव मागविण्याचा निर्णय
सन 2025-26 या वर्षासाठी यापूर्वी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने जिल्हा युवा पुरस्कार समितीने व्यापक प्रसिद्धी देऊन पुन्हा एकदा पात्र उमेदवार व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेतला आहे.
13 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करा
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव कार्य केलेल्या पात्र युवक, युवती आणि नोंदणीकृत संस्थांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव दि. 13 जुलै 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सादर करावेत. या पुरस्कारांचे वितरण 15 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
पुरस्काराबाबत अधिक माहिती अथवा अर्जासाठी क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेशी यांच्याशी मो. 90229 51924 या क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील पात्र युवक, युवती आणि नोंदणीकृत संस्थांनी या संधीचा लाभ घेत आपले परिपूर्ण प्रस्ताव वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी केले आहे.





