स्पोर्ट्स पॅनोरमा | वृत्तसेवा : भारतीय क्रीडाविश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली असून, भारताचे दिग्गज नेमबाज, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते आणि ख्यातनाम प्रशिक्षक जसपाल राणा यांचे वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय नेमबाजी क्षेत्रावर शोककळा पसरली असून, खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने (NRAI) त्यांच्या निधनाची अधिकृत पुष्टी केली आहे. आपल्या दमदार कारकिर्दीत जसपाल राणा यांनी १९९४ च्या हिरोशिमा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत भारताची मान उंचावली होती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी तब्बल १५ पदकांची कमाई केली होती. यामध्ये ९ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे.
खेळाडू म्हणून यशस्वी कारकीर्दीनंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही मोठा ठसा उमटवला. भारतीय पिस्तूल नेमबाजांचे हाय-परफॉर्मन्स कोच म्हणून त्यांनी अनेक युवा नेमबाजांना घडवले. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर, तसेच सौरभ चौधरी, अनिश भानवाला आणि चिंकी यादव यांसारख्या प्रतिभावान खेळाडूंच्या यशामागे त्यांचे मोलाचे मार्गदर्शन होते.
भारतीय क्रीडाक्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना १९९४ मध्ये अर्जुन पुरस्कार, १९९७ मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि २०२० मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या निधनाने भारतीय नेमबाजीने केवळ एक महान खेळाडूच नव्हे, तर अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा मार्गदर्शक गमावला आहे.
जसपाल राणा यांच्या अकाली निधनामुळे भारतीय क्रीडाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या कार्याची आणि योगदानाची आठवण कायम प्रेरणादायी राहील.





