जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विविध क्रीडा अनुदान योजनांअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहेत. व्यायामशाळा, क्रीडांगण विकास तसेच क्रीडा सुविधा निर्मितीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असून पात्र संस्था व शैक्षणिक संस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर यांनी केले आहे.
या योजनांमध्ये व्यायामशाळा विकास, क्रीडांगण विकास आणि क्रीडा सुविधा निर्मिती यांचा समावेश आहे. व्यायामशाळा बांधकाम, साहित्य खरेदी, क्रीडांगणावर धावपट्टी, प्रेक्षक गॅलरी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, फ्लडलाईट, संरक्षक भिंत, ड्रेनेज व्यवस्था, सिंचनासाठी स्प्रिंकलर यंत्रणा तसेच इतर मूलभूत सुविधा उभारण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे.
या योजनांसाठी अर्ज ३० जुलै २०२६ ते १३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संबंधित कार्यालयात सादर करावेत. पूर्ण भरलेले अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत २८ ऑगस्ट २०२६ असून त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जाचे नमुने विभागीय क्रीडा संकुल, मुख्य प्रशासक कार्यालय, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध आहेत.
शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद, कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच शासनमान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था या योजनांसाठी पात्र आहेत. याशिवाय विविध क्रीडा समित्या, पोलीस कल्याण निधी व पोलीस विभागाची कार्यालयेही या अनुदानासाठी अर्ज करू शकतात.