छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : तब्बल १८ वर्षांनंतर होत असलेल्या जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीने क्रिकेट विकासापेक्षा सत्तेच्या राजकारणाचीच अधिक चर्चा रंगवली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष यांसारखी महत्त्वाची पदे बिनविरोध झाल्यानंतर आता सदस्यपद आणि सहसचिवपदासाठीची लढतच निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरली आहे.
संघटनेच्या अध्यक्षपदी मंत्री अतुल सावे (Atul Save) यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी सचिन मुळे आणि उमेश डबरी, सचिवपदी शिरीष बोराळकर तर कोषाध्यक्षपदी अनिल इरावने यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी निर्माण झालेली चुरस अखेरच्या टप्प्यात अचानक कशी शांत झाली, याबाबत क्रिकेट वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
माघारी की व्यवस्थापन?
उपाध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या अनेक दिग्गजांनी अचानक माघार घेतल्याने राजकीय आणि संघटनात्मक समीकरणांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
विष्णू लोखंडे, चक्रधर दळवी, विशाल लोळगे, गौतम नंदावत, अनंत नेरळकर, दिनेश कुंटे, विक्रांत भाले, मोहनलाल बोरा आणि प्रभूलाल पटेल यांसारख्या इच्छुकांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने या माघारीमागे केवळ सामंजस्य होते की राजकीय व्यवस्थापन, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
क्रिकेट संघटनेच्या कॉरिडॉरमध्ये भविष्यातील पदांची आश्वासने, गटबाजी आणि सत्तेच्या समीकरणांचा प्रभाव याबाबत कुजबूज सुरू असल्याचे बोलले जात आहे.
सदस्यपदासाठी खरी चुरस
मोठी पदे बिनविरोध झाल्यानंतर आता सदस्यपदाच्या निवडणुकीतच खरी स्पर्धा रंगणार आहे. पाच जागांसाठी तब्बल दहा उमेदवार मैदानात उतरले आहेत.
सुयोग माछर, निखिल मिटकर, इकबाल सिद्दीकी, महिंदरसिंह कान्सा, पवन डोंगरे, हेमंत मुळे, मोहनलाल बोरा, गौतम नंदावत, सुशील वकील आणि सुधीर भालेराव हे उमेदवार विजयासाठी प्रयत्नशील आहेत.
पाच जागांसाठी दहा उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, गटबांधणी मजबूत करण्यासाठी आणि शेवटच्या क्षणी समीकरणे बदलण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
सहसचिवपदासाठी प्रतिष्ठेची थेट लढत
सहसचिवपदाच्या एका जागेसाठी आता थेट दोन उमेदवार आमनेसामने आले आहेत. करणसिंग डोग्रा आणि अतुल कराड यांच्यात सरळ सामना रंगणार आहे.
पवन डोंगरे आणि सुधीर भालेराव यांनी माघार घेतल्यानंतर ही निवडणूक दोन गटांच्या प्रतिष्ठेची लढत बनली आहे. संघटनेतील भविष्यातील नेतृत्वाची दिशा या निकालातून स्पष्ट होणार असल्याने या पदाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू; २३ जूनला लागणार निकाल
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूक प्रक्रियेने आता अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. १५ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, १६ जून रोजी याच वेळेत अंतिम चिन्हांकित उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
संघटनेच्या कार्यकारी मंडळासाठी २३ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी ४ वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी पूर्ण होताच अंतिम निकाल जाहीर केला जाणार असून, तब्बल १८ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत संघटनेची नवीन सत्ता कोणाच्या हाती जाणार याचा फैसला २३ जून रोजी होणार आहे.
२३ जून रोजी सिडको स्टेडियमवर मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे जागतिक ऑलिम्पिक दिनीच जिल्हा क्रिकेट संघटनेतील नवीन सत्ताकेंद्र निश्चित होणार आहे.
१८ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत कोणाचा प्रभाव वाढतो, कोणाची राजकीय ताकद सिद्ध होते आणि कोणाला आणखी प्रतीक्षा करावी लागते, याचा फैसला २३ जूनला होणार आहे.
सध्या क्रिकेटच्या विकासापेक्षा गटबाजी, माघारी, दबावाचे राजकारण आणि सत्तेची समीकरणे यांचीच चर्चा अधिक रंगली असून, मैदानावरील क्रिकेट सुरू होण्यापूर्वीच संघटनेतील राजकीय सामना रंगात आल्याचे चित्र दिसत आहे.





