विशेष प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन, आयोजन आणि त्यासंदर्भातील विविध प्रश्नांकडे महापौर समीर राजूरकर आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी स्वतः लक्ष द्यावे, अशी मागणी विविध क्रीडा संघटना आणि महानगरपालिका हादितील शाळांतील शारीरिक शिक्षकांच्या वतीने होत आहे.
शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनादरम्यान क्रीडांगणांची उपलब्धता, वेळापत्रक, आवश्यक क्रीडा सुविधा, विविध खेळांचे नियोजन, शाळा व क्रीडा संघटनांमधील समन्वय यासह अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे क्रीडा क्षेत्रातील प्रतिनिधींचे म्हणणे आहे. या प्रश्नांवर महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या स्तरावर वेळेत आणि समाधानकारक तोडगा निघणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, महानगरपालिका क्रीडा विभागातील संजीव बालय्या यांच्या स्तरावर अनेक प्रश्न समाधानकारकरीत्या सोडवले जात नसल्याचा तसेच क्रीडा संघटना आणि शारीरिक शिक्षकांकडून मांडल्या जाणाऱ्या काही समस्या महापौर व महानगरपालिका आयुक्तांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याचा आरोप क्रीडा क्षेत्रातून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती आणि क्रीडा क्षेत्राच्या अडचणी वरिष्ठ प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी थेट संवादाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनासाठी होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीला महापौर समीर राजूरकर आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी स्वतः उपस्थित राहावे, अशी आग्रही विनंती क्रीडा संघटना आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
बैठकीला वरिष्ठ अधिकारी स्वतः उपस्थित राहिल्यास शारीरिक शिक्षक आणि क्रीडा संघटनांना आपल्या समस्या थेट मांडता येतील. कोणत्या समस्या प्रलंबित आहेत, त्यामागील कारणे काय आहेत आणि त्या सोडविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून कोणते निर्णय आवश्यक आहेत, यावरही प्रत्यक्ष चर्चा होऊ शकेल.
“शालेय क्रीडा स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या क्रीडा भविष्याशी संबंधित आहेत. त्यामुळे क्रीडा विभागाच्या स्तरावर प्रश्न प्रलंबित राहण्याऐवजी ते महापौर आणि महानगरपालिका आयुक्तांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. वरिष्ठांनी बैठकीला स्वतः उपस्थित राहून क्रीडा संघटना आणि शारीरिक शिक्षकांचे म्हणणे ऐकावे व आवश्यक मार्गदर्शन करावे,” अशी भावना क्रीडा क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील हजारो विद्यार्थी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत असल्याने या स्पर्धांकडे केवळ प्रशासकीय कार्यक्रम म्हणून न पाहता भावी खेळाडू घडविण्याचे व्यासपीठ म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासन, क्रीडा विभाग, शाळा, शारीरिक शिक्षण शिक्षक आणि क्रीडा संघटना यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
त्यामुळे आगामी बैठकीत महापौर समीर राजूरकर आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून क्रीडा क्षेत्राच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी आता क्रीडा क्षेत्रातून जोर धरत आहे.




