स्पोर्ट्स पॅनोरामा | वृत्तसेवा
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या पदकांच्या खात्यात आणखी एका रौप्यपदकाची भर पडली आहे. महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राची २३ वर्षीय ज्ञानेश्वरी यादव हिने अप्रतिम कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. तिच्या या यशामुळे भारताच्या पदकसंख्येत आणखी भर पडली असून संपूर्ण देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ज्ञानेश्वरीने स्पर्धेत एकूण १९९ किलो वजन उचलत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे तिने या कामगिरीदरम्यान स्पर्धा विक्रमाचीही नोंद केली. तिच्या या दमदार प्रदर्शनामुळे भारताला राष्ट्रकुल स्पर्धेतील पाचवे पदक मिळाले.
ही कामगिरी केवळ पदकापुरती मर्यादित नाही. अत्यंत साध्या आणि आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या ज्ञानेश्वरीच्या संघर्षाची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. तिचे वडील इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत तिने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले.
पदक निश्चित झाल्यानंतर ज्ञानेश्वरीने खुर्चीवर ठेवलेल्या तिरंग्यासमोर नतमस्तक होत देशाविषयीचा अभिमान आणि आदर व्यक्त केला. हा भावनिक क्षण उपस्थित प्रेक्षकांसह संपूर्ण भारतीय क्रीडाप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताची कामगिरी सातत्याने उंचावत असून आतापर्यंत १ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ५ पदकांची कमाई भारताने केली आहे. ज्ञानेश्वरी यादवच्या रौप्यपदकामुळे भारतीय वेटलिफ्टिंगला नवसंजीवनी मिळाली असून आगामी स्पर्धांसाठीही मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.





