स्पोर्ट्स पॅनोरमा | छत्रपती संभाजीनगर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय ,पुणे, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा १३ जुलै ते २८ जुलै २०२६ या कालावधीत जिल्हा व महानगरपालिका स्तरावर विविध मैदानांवर पार पडणार आहेत.
स्पर्धेत १५ वर्षांखालील मुले तसेच १७ वर्षांखालील मुले व मुली या गटांचा समावेश करण्यात आला आहे. महानगरपालिका आणि जिल्हा स्तरावरील विजेते संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र शाळांनी विहित मुदतीत नोंदणी करून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. शालेय फुटबॉलला चालना देण्यासाठी आणि गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या स्पर्धेतून अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे भारतीय फुटबॉलपटू घडले असून यंदाही जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक
महानगरपालिका स्तर स्पर्धेची ठिकाणे
- १५ वर्षांखालील मुले : १३ ते १४ जुलै डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
- १७ वर्षांखालील मुले : १७ ते १९ जुलै डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ फुटबॉल मैदान, छत्रपती संभाजीनगर
- १७ वर्षांखालील मुली : २३ ते २५ जुलै भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) केंद्र, छत्रपती संभाजीनगर
जिल्हास्तर स्पर्धेची ठिकाणे
- १५ वर्षांखालील मुले : १५ ते १६ जुलै डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
- १७ वर्षांखालील मुले : २० ते २२ जुलै डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
- १७ वर्षांखालील मुली : २७ ते २८ जुलै डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
पात्रता
- १५ वर्षांखालील गट : १ जानेवारी २०१२ किंवा त्यानंतर जन्मलेले खेळाडू.
- १७ वर्षांखालील गट : १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर जन्मलेले खेळाडू.
नोंदणी अनिवार्य
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांनी https://www.subrotocup.in/register या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. १५ वर्षांखालील खेळाडूंना AIFF मान्यताप्राप्त Skeleton Maturity Age Determination Test करणे आवश्यक राहील.
आवश्यक कागदपत्रे
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जन्मदाखला, आधार कार्ड किंवा पासपोर्टची मूळ प्रत सादर करणे आवश्यक आहे. तसेच सर्व खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा खेळाडू आढळल्यास संबंधित संघ बाद करण्यात येईल.
प्रवेशिका
स्पर्धेच्या प्रवेशिका आणि प्रवेश शुल्क ६ ते १० जुलै २०२६ या कालावधीत ऑफलाइन स्वीकारण्यात येणार आहेत. १० जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात भाग्यपत्रक (लॉट्स) काढण्यात येणार असून सर्व संघांच्या प्रशिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय डॉ. रेखा परदेशी क्रीडा अधिकारी 9022551924 , अथवा महानगरपालिका क्रीडा विभागाशी संजीव बालय्या 9160452371 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





