छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (TAM) ने राज्यातील तायक्वांदो क्रीडा प्रशासनाचे संपूर्ण डिजिटलायझेशन करत पारदर्शक, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापनाची नवी दिशा दिली आहे. भारतातील सर्वात प्रगत ऑनलाइन क्रीडा व्यवस्थापन प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित करून असोसिएशनने क्रीडा प्रशासनात ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
गेल्या वर्षभरापासून कार्यरत असलेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे खेळाडूंची नोंदणी, स्पर्धा व्यवस्थापन, प्रमाणपत्र वितरण, आर्थिक व्यवहार आणि अधिकृत रेकॉर्डचे व्यवस्थापन पूर्णपणे ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या वयातील फेरफार, बनावट प्रमाणपत्रे, दुहेरी नोंदणी आणि अधिकृत डेटाबेसच्या अभावासारख्या गंभीर समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
या प्रणालीमध्ये जिल्हा संघटना, अकॅडमी आणि खेळाडूंसाठी स्वतंत्र लॉगिन सुविधा, ऑनलाइन स्पर्धा नोंदणी, केंद्रीकृत खेळाडू डेटाबेस आणि १०० टक्के कॅशलेस ऑनलाइन पेमेंट प्रणाली उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक खेळाडूला कायमस्वरूपी डिजिटल प्रोफाईल दिले जात असून त्यामध्ये वैयक्तिक माहिती, स्पर्धांतील कामगिरी, बेल्ट प्रमोशन, पदके, प्रशिक्षक व पंच पात्रता यांचा संपूर्ण इतिहास सुरक्षित स्वरूपात जतन केला जात आहे.
या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये ‘PhonePe’ पेमेंट गेटवेचा समावेश करण्यात आला असून सर्व शुल्क व्यवहार सुरक्षित, जलद आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण होत आहेत. यामुळे खेळाडू, पालक आणि जिल्हा संघटनांना कोणत्याही अडचणीशिवाय ऑनलाइन व्यवहार करता येत आहेत.
प्लॅटफॉर्मचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वयंचलित डिजिटल प्रमाणपत्र प्रणाली. स्पर्धा किंवा कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर संबंधित खेळाडूंची प्रमाणपत्रे स्वयंचलितपणे तयार होऊन त्यांच्या ई-मेलवर पाठवली जातात. त्यामुळे कागदी कामकाजात मोठी बचत झाली असून बनावट प्रमाणपत्रांचा धोका जवळपास संपुष्टात आला आहे. आगामी काळात खेळाडूंसाठी ‘Player Rating System’ देखील सुरू करण्यात येणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची संकल्पना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी मांडली. क्रीडा क्षेत्रातील त्रुटी जवळून अनुभवल्यानंतर खऱ्या खेळाडूंचे हित जपण्यासाठी त्यांनी ही डिजिटल व्यवस्था विकसित करण्याचा पुढाकार घेतला. तांत्रिक अंमलबजावणीचे नेतृत्व ब्लिस टेक्नॉलॉजी लॅब्सचे संचालक आणि राज्य तायक्वांदो पदक विजेते आशुतोष जोशी यांनी केले.
असोसिएशनचे अध्यक्ष संदीप ओंबासे यांनी सांगितले की, या आधुनिक प्रणालीमुळे खेळाडूंना थेट लाभ होणार असून तायक्वांदोच्या भावी पिढ्यांसाठी हा भक्कम पाया ठरेल. तर सरचिटणीस गफार पठाण यांनी डिजिटलायझेशनमुळे कार्यक्षमतेत मोठी वाढ झाली असून प्रशासन अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह बनल्याचे सांगितले.
डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, ही प्रणाली केवळ तायक्वांदोपुरती मर्यादित नसून भारतातील सर्व कॉम्बॅट स्पोर्ट्स तसेच वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकारांसाठीही उपयुक्त ठरू शकते. भविष्यात देशभरातील विविध क्रीडा संघटनांसाठी एक समान डिजिटल गव्हर्नन्स फ्रेमवर्क विकसित करण्याची क्षमता या प्लॅटफॉर्ममध्ये असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीत उपाध्यक्ष तुषार आवटे, घनश्याम सानप, सचिव सुरेश चौधरी तसेच कार्यकारिणी सदस्य प्रमोद दौंडे, नारायण वाघाडे आणि पद्माकर कांबळे यांनीही मोलाचे योगदान दिले आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून क्रीडा प्रशासनात पारदर्शकता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढविण्याचा हा महाराष्ट्राचा उपक्रम देशातील इतर क्रीडा संघटनांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.





